बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Wednesday 24 December 2014

' ट्रेक्षणीय - १ ' - राजमाची.

२००५ पासून नंतरच्या ४-५ वर्षांत शंभरच्या आसपास ट्रेक केले. त्यात काही ठराविक किल्ले १ पेक्षा जास्तवेळा पण केले. आणि काही करायचे, करायचे म्हणत अजून बाकीच आहेत. राजगड काय किंवा सिंहगड काय, अनेकवेळा का चढलो ? या प्रश्नाचे जसे काहीच उत्तर असू शकत नाही. तसेच राजमाचीच्या राजवाटेवर दोनवेळा पायपीट करायचे कारण काय ? याचेही उत्तर मला मिळत नव्हते.

असा हा राजमाचीचा दुसरा ट्रेक नंतर अनेक गोष्टींमुळे लक्षात राहिला. त्यातल्या काही, म्हणजे - आलो त्या वाटेने न जाता, उलट्या बाजूने उतरायचे ठरले. म्हणजे परत लोणावळ्याकडे न जाता, कर्जतच्या बाजूला 'कोंडीवडे' गावात उतरायचे [हे ठरले अर्थातच 'एक' मताने ]. त्यामुळे थोडे चाचपडतच उतरलो. बरीच जास्तीची पायपीट झाली. अगदी रस्ता कधी संपतो असे होऊन गेले. आणि असे बरेच काही.

"तीन पाऊस पडून गेले, आता पावसाळी ट्रेक सुरु करूया", असे म्हणून ठरलेला, त्या मौसमातला हा पहिला पावसाळी ट्रेक, थेंबभरही पाउस न पडता सुद्धा आम्हाला शब्दशः चिंब भिजवून गेला. भरपूर आभाळ आलं होत, वातावरणात प्रचंड आर्दता होती. घाम इतका येत होता कि ५ मिनिट चाललो तरी पाणी / ग्लुकॉन-डी प्यावे लागत होते. जवळचे पाणी लवकरच संपले. राहिलेली वाट संपता संपेना. अखेर पायथ्याचे गांव दिसले. गावात कसेबसेच पोहोचलो. जे पहिले लागले त्या दुकानाच्या ओसरीवर सगळ्यांनी बसकणच मारली. पाण्याच्या बाटलीची चौकशी केली असता, "कोका कोला मिळेल" असे उत्तर मिळाले. शीतपेयांमध्ये काळ्यारंगाचे कुठलेच पेय मी कधीच पीत नसूनही, त्यादिवशी एका मागे एक ४ बाटल्या 'कोक' पिऊन आयुष्यातली सगळी कसर भरून काढली.

हे सगळे प्रकार दुसऱ्या दिवशीचे. आदल्या दिवशी लोणावळ्याहून निघालो तेंव्हा पण पाउस नव्हताच. पण संध्याकाळची वेळ असल्याने हवेत थोडा गारवा होता. रस्ता लांबचा होता पण फार चढण नव्हती. त्यामुळे आरामात गप्पा मारत-मारत मार्गक्रमण चालले होते.

तुंगर्ली धरण मागे टाकून, ठाकर वस्तीवरून एक वळण चढून पुढे आलो आणि कोणाला आधी दिसले आठवत नाही, पण बरेच म्हणजे आठ-दहा काजवे चमचम करताना दिसले. "आहा" म्हणून इकडे तिकडे बघितले तर अजून बरेच दिसले.

शाळेत असतांना, पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात एखाद्या दिवशी जर अगदी अंधार पडेपर्यंत बाहेर खेळत बसलो तर घरी येताना कॉलनीत कुठेतरी, किंवा घराबाहेर अंगणात एखादा काजवा लख्खन चमकून जायचा. अनेक प्रयत्नांमधला एखादा यशस्वी झाला तर तो आमच्या काडेपेटीत कोंडला जायचा. पण काडेपेटीतल्या अंधारात मात्र कधीच तो चमकला नाही. हिरमुसले होऊन शेवटी त्याला सोडून दिले जायचे. तो उडून जायचा कि खाली पडायचा हे पाहिल्याचे काही आठवत नाही. आम्ही आपले दुसऱ्या काजव्याच्या शोधात. एकावेळी जास्तीत जास्त ४ किंवा ५ एवढेच काजवे असायचे. पण "तो बघ तिकडे एक, इकडे पण एक, तुझ्या डोक्यावर बघ उडतो आहे" असा आमचा जोरदार आरडा ओरडा चालू असायचा. क्वचित आणि अगदी आभास वाटावा इतके पुसट दर्शन देणाऱ्या कुठल्याही गोष्टीचे, सुप्त आणि खास आकर्षण प्रत्येकाच्याच मनात असते.
इथे तर त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त काजवे होते. मात्र उत्सुकता आणि आरडा-ओरडा अगदी तोच होता. 'हे बघा, तिकडे बघा, अरे तिकडे काय बघता इकडे बघा, कॅमेरा कुठे आहे, पटकन फोटो काढा' असे सगळे चालले होते कारण आमच्या समोर एक आख्खे काजव्यांचे झाड होते. कल्पना करा, रात्रीची वेळ, काळोखात भर घालण्यासाठी भरून आलेलं आभाळ. ना वर- ना खाली, कुठेही ना उजेडाची तिरीप ना एखादा ठिपका. अशा अंधाऱ्या पायवाटेवर अचानक तुमच्या समोर चमचमणारा एक भलामोठा वृक्ष येतो !
मिट्ट काळोखात ते दृश्य असे दिसत होते जसे काही ते झाड आभाळाला जाऊन टेकले आहे आणि सगळ्या चांदण्या आभाळातून उतरून झाडाला बिलगल्या आहेत.

काय कारण असावे माहिती नाही, पण ते सगळे काजवे त्या झाडाच्या आकृती प्रमाणेच फेर धरून चमचमत होते. भारावलो, हरखलो, विसावलो आणि पुढे निघालो .... उल्हास नदीचे खोरे डाव्या हाताला ठेवत एक वळण चढून सामोरे गेलो तर ... तर संपूर्ण दरी अक्षरशः लखलखत होती. आता मात्र सोबत होती नि:शब्द पायवाट आणि चंदेरी लखलखाट.

सह्याद्रीतले गड-किल्ले प्रत्येक ऋतुत वेगळ्याच रुपात भेटतात हे नक्की .... आणि त्यासाठीच होता हा दुसरा ट्रेक.

- Arati.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.